मोठी बातमी: बदलापूरात जनआक्रोशापुढे भाजप झुकली! टीकेची झोड उठल्यानंतर तुषार आपटेंचा २४ तासांत ‘राजीनामा’
बदलापूर: बदलापूरच्या शाळेतील चिमुकल्यांवरील अत्याचार प्रकरणातील सहआरोपी तुषार आपटे यांची ‘स्वीकृत नगरसेवक’ म्हणून झालेली नियुक्ती अखेर रद्द झाली आहे. सर्व स्तरांतून होणारा तीव्र विरोध आणि वाढता राजकीय दबाव लक्षात घेता, भाजपने माघार घेतली असून तुषार आपटे यांनी आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे.
नेमका काय होता प्रकार?
शुक्रवारी कुळगाव-बदलापूर नगरपरिषदेत भाजपच्या कोट्यातून तुषार आपटे यांची स्वीकृत नगरसेवक म्हणून निवड करण्यात आली होती. मात्र, ज्या संवेदनशील प्रकरणात मुख्य आरोपी अक्षय शिंदेचा एन्काऊंटर झाला, त्याच प्रकरणात सहआरोपी असलेल्या व्यक्तीला सन्मानाचे पद दिल्याने बदलापूरकर संतापले होते.२४ तासांत ‘यू-टर्न’!या नियुक्तीची बातमी वाऱ्यासारखी पसरताच सोशल मीडियावर संतापाचा उद्रेक झाला. मनसे, शिवसेना (ठाकरे गट) आणि सर्वसामान्य नागरिकांनी भाजपच्या या निर्णयावर कडक शब्दांत टीका केली होती. हे प्रकरण अंगाशी येत असल्याचे पाहून वरिष्ठांच्या आदेशानुसार आज (शनिवारी) आपटे यांचा राजीनामा घेण्यात आला.विरोधकांचा विजय की भाजपची चूक सुधारण्याची धडपड?
“एकीकडे लाडकी बहीण योजना राबवायची आणि दुसरीकडे अशा प्रकरणातील आरोपींना पदे द्यायची, हा कोणता न्याय?” असा सवाल विरोधकांनी उपस्थित केला होता. अखेर २४ तास पूर्ण होण्याआधीच आपटे यांना पायउतार व्हावे लागल्याने ही भाजपसाठी मोठी राजकीय नाचक्की मानली जात आहे.
बदलापूरच्या अस्मितेचा आणि जनभावनेचा हा विजय असल्याची चर्चा सध्या शहरात रंगली आहे .



